पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक
पुणे | पुण्यातील कल्याणी नगर भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
रविवारी पहाटे झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर केले होते. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात यावी तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत आरोपीला जामीन मंजूर केला होता. तसेच अपघातावर ३०० शब्दाचा निबंध लिहावा, असे आदेश दिले होते.
हेही वाचा – देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
दरम्यान, या अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्पोर्ट्स कार तब्बल २०० च्या स्पीडने असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं सांगितलं. अपघातामधील दोघांच्या मृत्यूनंतर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंढव्यातील Cosie बार विरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केलं आहे. रात्री याच बारमध्ये पार्टी करून त्या अल्पवयीन मुलाच्या कारने धडक तरुण-तरुणीच्या दुचाकीला धडक दिली होती. या बारमधून अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असल्याचा भाजप युवा मोर्चाने आरोप केला आहे.