भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
![Udayan Rajen's first reaction after the announcement of candidature from Satara by BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Udayanraje-Bhosale-780x470.jpg)
पुणे | सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने उदयनराजेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी उदयनराजेंना दिली आहे. यानंतर कॉलर उडवत उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे म्हणाले की, मला उमेदवारी मिळणारच होती, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना राबवली. तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत आणि लोकांची सेवा करत आहोत. तरुण, माता-भगिनींचं प्रेम यांची साथ मला मिळाली. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की उमेदवारी मिळणार. कोण काय बोलतं त्याकडे मी लक्ष देत नाही. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे सरकार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राबवणारे सरकार आहे.
हेही वाचा – आरसीबीला मोठा धक्का! ग्लेन मॅक्सवेलची IPLमधून माघार
माझे मित्र आणि माजी मुख्यमंत्री तसंच आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या विकासाची कामं महाराष्ट्रात झाली असं म्हणत उदयनराजेंनी महायुतीच्या सरकारचं कौतुक केलं आहे. जेव्हा अस्थिर सरकार असतं तेव्हा प्रत्येकजण दबाव टाकत असतं. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी येत असतात. केंद्रात आणि राज्यात खंबीर सरकार आहे. विकासकामं होत आहेत, झाली आहेत. लोकांना अपेक्षित असलेली त्यांची हिताची कामं या सगळ्यांकडून केली जातील असा मला विश्वास वाटतो, असंही उदयनराजे म्हणाले.