श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुंबई | कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद सुरू होता. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे महायुतीकडून नेमका काय निर्णय होणार? याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपाकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कोणताही विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील. भाजपा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. पूर्ण ताकदीने आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही निवडून आणू. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही युती त्यांना निवडून आणेल.
हेही वाचा – ‘काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन म्हणजे लबाडाघरचे जेवण’; भाजप नेत्यांचा टोला
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता कल्याणमध्ये दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरूद्ध वैशाली दरेकर राणे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.