विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
लोकसभा निवडणूक : पुणे-नाशिक हायवेसाठी आमचे योगदान : आढळराव पाटील
![Doing development work is not the same as acting; Adarao Patal's target on the shoulder](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Adhalrao-Patil-780x470.jpg)
पुणे: पुणे नाशिक हायवेसाठी २००८ ते २०१३ तत्कालीन काँग्रेस सरकारसोबत भांडलो. त्यानंतर मंजुरी मिळाली तर नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात टेंडर निघाले. आज बोलणारे त्यावेळी राजकारण नव्हते, यामध्ये मी केलेला पाठपुरावा दाखवतो त्यांनी त्यांचे योगदान दाखवावे, असा टोला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे यामध्ये आता वंचित ने देखील उडी घेतल्या असून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काल आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी हडपसरमध्ये शिवसेनेच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला.
बैलगाडा बंदी उठवण्यासाठी मी स्वतः औरंगाबाद खंडपीठात याचिका केली, पुढे हायकोर्टात देखील स्वतःच्या पैशाने लढलो. ही बंदी उठवण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या केसेस देखील माझ्या अंगावर आहेत. आज जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बैलगाड्याशी काही संबंध नाही ते केवळ घोडीवर बसणारे आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही काम केलं नाही, त्यांच्याकडे केवळ बोलण्याची कला असून गोड गोड बोलतात. एखादे विकासकाम करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखे सोपे नाही, असा घणाघात आढळराव पाटील यांनी केला आहे.