‘गोविंदाने दाऊदच्या पैशांनी निवडणूक लढवली होती’; भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं वक्तव्य
![Ram Naik said that Govinda had contested elections with Dawood's money](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Ram-Naik-780x470.jpg)
मुंबई | प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे गोविंदा कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी गोविंदालर गंभीर आरोप केले आहेत.
राम नाईक म्हणाले की, मी गोविंदाना चांगलाच ओळखून आहे. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून मला हरवले होते. त्यांच्याशी मैत्री कधी होऊच शकत नाही. गोविंदा यांनी उमेदवारी मिळाल्यावर काही भूमिका मांडल्यास त्यावर मी नक्की बोलेल, तेच योग्य होईल. गोविंदा खोटारडे आहेत. त्यांनी दोन ते तीन वेळा आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले होते. राजकारणात कधीच परतणार नाही, असे म्हटले होते. पण आता ते परत आले आहेत.
हेही वाचा – राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज
गोविंदाने दाऊदच्या पैशांनी निवडणूक लढवली होती. माझ्या आरोपावर मी ठाम आहे. त्यांनी माझे आरोप फेटाळून लावले नाही. त्याला चॅलेंजही केलं नाही. त्याचे कोणी मित्रही इतक्या वर्षात आरोप खोडून काढायला आले नाही. माझ्या पुस्तकात मी या आरोपाचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशित होऊन सात आठ वर्षही झाले आहेत. इतक्या वर्षात ते काहीच बोलले नाही. माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जाईल असं काही मी कधी इतक्या वर्षात बोललो नाही. शब्द मागे घेण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही. मी विचार करून बोलत असतो, असंही राम नाईक म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद नाही. त्यांना लोकांचं पाठबळ नाही. त्यांचा मुंबईत आमदारही कधी निवडून आलेला नाही. शिवसेनेची अवस्थाही तशीच झाली आहे. शिवसेनेतून एक मोठा गट बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखी शिवसेना राहिली नाही. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. इंडिया आघाडीला उमेदवार जाहीर करता करता नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं, असंही राम नाईक म्हणाले.