जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी सुमारे ३९ लाख रुपये महसूल जमा
![About Rs 39 Lakh revenue collected on a single day through e-auction of impounded vehicles](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Pimpri-Chinchwad-9-780x470.jpg)
पुणे | पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या ११ वाहनांचा ६ मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला असून त्यामध्ये ३८ लाख ९० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
कर न भरलेली व गुन्ह्यात अटकावून ठेवलेली १३ वाहने ई-लिलावासाठी उपलब्ध होती. यात बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या मालकांनी वेळोवेळी संधी देऊनही थकीत कर भरणा केला नसल्याने या वाहनांचा www.eauction.gov.in या शासकीय संकेतस्थळावर ई-लिलाव ठेवण्यात आला. त्यापैकी ११ वाहनांना ऑनलाईन बोली प्राप्त झाली व त्यानुसार महसूल प्राप्त झाला आहे.
हेही वाचा – ‘अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील’; रोहीत पवारांची घणाघाती टीका
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत जाहीर ई-लिलावाद्वारे १ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय महसूल वसूल करण्याची कार्यवाही केली आहे. थकीत मोटार वाहन कर वसुलीकरीता यापुढेही ई-लिलाव केले जातील याची नोंद घेऊन थकीत मोटार वाहन कर भरावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.