लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-82-1-780x470.jpg)
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी देशातील ५४३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणूक कार्यक्रमांची प्रतिक्षा होती. घोषणेआधीच देशभरात लोकसभा निवडणुकीचा महौल तयार झाला होता. पक्षबांधणी, मोर्चेबांधणी, जाहीर सभा, प्रचारसभा, आश्वासनं दिली जात आहेत.
२०१४, २०१९ मध्ये महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केलंय. यंदाची निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये महायुती की इंडिया आघाडी विजयी होतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच, २०२४ नंतरच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून तयारी सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आगामी निवडणुकीबाबत भाकीत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मोदी काय आहेत हे शोधण्यासाठी तुमची संपूर्ण टीम लावा. त्यांना ते शोधून काढू द्या. तुम्ही २०२९ ला अडकलात, मी तर २०४७ ची तयारी करत आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ नंतरच्या निवडणुकांबाबतही सकारात्मक भाष्य करून तेच पुढेही भाजपाचंच सरकार सत्तेत राहणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. आजच लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या असताना त्यांचं हे विधान महत्त्वाचं आहे.
हेही वाचा- ‘ईव्हीएम’वर प्रश्न येताच मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिले उत्तर
“जेव्हा मी अशा कॉन्क्लेव्हला जातो तेव्हा माझ्याकडून हेडलाइन्सची अपेक्षा केली जाते. पण मी डेडलाइनवर काम करणारा व्यक्ती आहे, हेडलाईनवर नाही”, असा टोलाही मोदींनी लगावला. देशातील स्टार्टअप्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. “१० वर्षांपूर्वी जवळपास १०० स्टार्टअप्स होते. आता १.२५ लाख स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. भारतातील स्टार्टअप ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये आहेत, ज्यात देशाच्या क्षेत्रफळाचा ९० टक्के वाटा आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
२०१४ पासून त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ६८० वेळा ईशान्येकडील राज्यांना भेटी दिल्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले, “मी, पंतप्रधान म्हणून देशाच्या इतर सर्व पंतप्रधानांनी केलेल्या एकत्रित दौऱ्यांपेक्षा ईशान्येकडील राज्यांना जास्त भेटी दिल्या आहेत.”