‘CAA कायदा हवा की नको? उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं’; अमित शाह यांचं आव्हान
![Amit Shah said that Uddhav Thackeray should clarify whether he wants CAA law or not](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Amit-Shah-and-Uddhav-Thackeray-780x470.jpg)
नवी दिल्ली | केंद्र सरकारने CAA अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगावं. राजकारण करू नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा.
हेही वाचा – ‘जीएसटीमधून शेतकऱ्यांची सुटका करणार’; राहुल गांधींची घोषणा
उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहेत. मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सगळं करत आहेत. सध्याच्या घडीला मतं मिळवण्यासाठी हे सगळं चाललं आहे. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे, असं अमित शाह म्हणाले.
सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही, असंही अमित शाह म्हणाले.