‘निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये’; अजित पवार यांचा इशारा
पुणे : लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर या आधीही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. निलेश लंके असं काही करणार नाहीत असं ते म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांचा आमदारकी जाणार असा सज्जड दमच अजित पवारांनी दिला. शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असंही ते म्हणाले.
निलेश लंके यांनी जर शरद पवारांची साथ द्यायचं ठरलं तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप सर्वाना लागू आहे, त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतली तर त्यांची आमदारकी जाणार असा इशाराच अजित पवारांनी दिला. त्यामुळे निलेश लंके आता काय करणार हे पाहावं लागेल.
हेही वाचा – ‘जीएसटीमधून शेतकऱ्यांची सुटका करणार’; राहुल गांधींची घोषणा
आमदार निलेश लंके यांनी चुकीची भूमिका घेऊ नये, आणि घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असं अजित पवार म्हणाले. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जाते असं अजित पवार म्हणाले.
निलेश लंके हे त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारणावर नाराज असल्याची माहिती असून आपण त्यामध्ये लक्ष घालणार असल्याचंही ते अजित पवार म्हणाले.
शरद पवार गटाकडे उमेदवार नसल्यानं त्यांनी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा सुरू केली असल्याचं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, ज्यावेळी आम्ही वेगळी भूमिका घेतली, त्यावेळी हेच लोक सांगत होते की यातील कुणालाही परत घेतलं जाणार नाही. आता सहाच महिन्यात त्यांनी ही भूमिका बदलल्याचं दिसून आलंय. त्यामुळेच समोरचे लोक आता आमच्या नेत्यांना बोलवत आहेत.