१०-१० वेळा पक्षात येण्याचा निरोप का पाठवता? अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट
पुणे | सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही, अशी टीका अजित पवार म्हणाले. यावरून अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, मला मागच्या निवडणुकीत (लोकसभा २०१९) शरद पवार यांनी संधी दिली. मी त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. माझी संसदेतील कामगिरी आणि त्या कामगिरीचा लेखाजोखा सर्वत्र उपलब्ध आहे. तो तुम्ही पाहू शकता. तसेच मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी जी भूमिका घेतली आहे त्यावर ठाम आहे आणि पुढेही त्या भूमिकेवर ठाम राहीन. शिरूर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कटीबद्ध राहीन.
अजित पवार मला सेलिब्रिटी उमेदवार म्हणून हिणवत आहेत. तसेच सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक होती असं त्यांनी सांगितलं. तसेच जेव्हा एखाद्या मतदारसघात उमेदवार मिळत नाही तेव्हा तिथे सेलिब्रिटी उमेदवार दिला जातो असंही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अभिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, धर्मेंद्र या कलाकारांची उदाहरणं दिली. परंतु, मी एक गोष्ट सांगतो की, अजित पवारांनी ज्यांची उदाहणं दिली त्यातल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा – मावळमध्ये ठाकरे गटाकडून संजोग वाघेरेंना उमेदवारी जाहीर
खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल, वेगवेगळे आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? असं कोल्हे म्हणाले.
अजित पवार सातत्याने दावा करत आहेत की, मी त्यांना राजीनामा देण्याबद्दल बोललो होतो. परंतु, मला त्यांना विचारायचं आहे की, या काळात मी संसदेत कधी अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं आणि माझ्या मतदारसंघातील प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? माझ्या कामाचा लेखाजोखा पाहिला तर एक गोष्ट मी आवर्जून नमूद करेन की. तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (सुनील तटकरे) हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संसदीय कामगिरीपेक्षा तुम्ही ज्याला सेलिब्रिटी म्हणून हिणवता त्या अमोल कोल्हेंची कामगिरी कायमच उजवी राहिली आहे. हवं तर रेकॉर्ड तपासून पाहा, असंही अमोल कोल्हे म्हणाले.