पुणे: आळंदीच्या जळीतकांडात मृतांचा आकडा ३ वर पोहचला आहे. चार जखमींची प्रकृती अद्याप ही चिंताजनक आहे. स्पेसिफिक अलॉय कंपनीच्या निष्काळजीपणामुळं निष्पापांचे जीव गेले, कंपनी चार वर्षांपासून बंद असताना ही, एका खोलीत ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आला होता. त्यालाच आग लागल्यानं ही दुर्घटना घडली, असं आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झालंय. म्हणूनच कंपनी मालकासह दोघांना याप्रकरणी जबाबदार धरण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आळंदी पोलिसांनी नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी पुणे), आनंद हरकचंद मुनोत (रा. कस्तुरकुंज सोसायटी शिवाजीनगर पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोधात आहेत. काल आळंदीतील साळू गावात भीषण स्फोट झाला होता. त्यात रस्त्यावर उभा असलेल्या व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. तर सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील दोन जणांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अद्याप चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.