स्पर्धा परिक्षेसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून केलेली तयारी व्यर्थ, बलात्कार पीडितेची व्यथा
![Accused of raping and killing a 3-year-old girl at Pen in Raigad arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Rape-1-1.jpg)
जर सर्व काही व्यवस्थित असतं तर 19 सप्टेंबरला तिने सरकारी नोकरीसाठी परिक्षा दिली असती. पण त्याऐवजी ती रुग्णालयात बेडवर निपचित पडली असून प्रचंड वेदना सहन करत आहे. 12 सप्टेंबरला रेवारी येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय तरुणीने गेल्या कित्येक महिन्यांपासून सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता. गावापासून काही अंतरावर असणाऱ्या कोचिंग सेंटरमध्येही तिने प्रवेश घेतला होता. १२ सप्टेंबरला सकाळी सात वाजता क्लासला जात असतानाच दोघांनी तिचं अपहरण केलं. रविवारी हरियाणा पोलिसांनी उर्वरित दोघा आरोपींना अटक केल्याची घोषणा केली आणि अटक केलेल्या आरोपींचा आकडा पाचवर पोहोचला. आरोपींचा याआधीच्या काही घटनांमध्येही सहभाग असल्याची शक्यता आहे. सर्व आरोपी कुटुंबाच्या ओळखीतले आहेत.
फी परवडत नसतानाही वडिलांनी मुलीला क्लास लावला होता. वडील एका स्थानिक शाळेत शिक्षक असून त्यांना महिना पाच हजार रुपये पगार आहे. तर क्लासची फी 5,400 रुपये होती. मुलीसाठी त्यांनी शाळेनंतर कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली होती. आरोपींपैकी एकजण त्यांच्याकडे शिकण्यासाठी यायचा.
‘रोज सकाळी ती आपल्या वडिलांसोबत स्कूलबसने जात असे. कोचिंग सेंटरजवळ असणाऱ्या बस स्टॉपवर ती उतरत असे. दुपारी 2.30 वाजता घरी परतत असताना पुन्हा ती स्कूल बसने यायची. अशा पद्धतीने ती आपलं बसंचे तिकीटाचे पैसे वाचवत होती’, अशी माहितीच्या तरुणीच्या काकांनी दिली आहे.
‘माझी मुलगी खेळ आणि अभ्यास दोन्हीमध्ये उत्तम होती. खेळात तिने राज्याचं प्रतिनिधित्व केलं आहे’, असं सांगताना तिच्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. आपल्या मुलीला केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेलं निमंत्रण दाखवत ते सांगत होते की, ‘दहावीत तिने चांगले गुण मिळवले होते. आम्हाला दिल्लीत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं होतं. ती पहिली वेळ होती जेव्हा मी दिल्लीला गेलो. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी जंतर मंतरवरील हॉस्टेलमध्ये सोय करण्यात आली होती. पालकांसाठी काही सोय नव्हती, पण तो अभिमानाचा क्षण असल्याने मी नाराज झालो नाही’.