‘हिट अँड रन’च्या काळ्या कायद्याविरोधात वाहतुकदारांचा आंदोलनाचा इशारा
कायदा मागे घ्या, अन्यथा देशभर तीव्र चक्काजाम आंदोलन करू : बाबा कांबळे
![Baba Kamble said that withdraw the law, otherwise there will be a severe strike across the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Baba-Kamble-780x470.jpg)
पुणे : ‘हिट अँड रन २०२३” या नवीन कायद्यानुसार अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या चालकाला दहा वर्षे शिक्षा व लाखो रुपये दंड आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णया विरोधात ट्रक, टेम्पो, बस व सर्व प्रकारच्या चालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
यामुळे देशातील सुमारे २५ कोटी चालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हा काळा कायदा रद्द करावा आणि चालकांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी बुधवारी ३ जानेवारी पासून दिल्ली मध्ये जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील ७५० पेक्षा जास्त संघटनाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले पाटील, सचिन तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतच पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.
मंगळवारी पुणे आणि पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास बाबा कांबळे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता पुष्पहार अर्पण करून प्रतिनिधी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. जे चालक दिल्लीमध्ये येऊ शकणार नाहीत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर बुधवारी सकाळी दहा वाजता आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.
हेही वाचा – पुण्यात मद्यधुंद तरूणीचा राडा, महिला पोलिसांना मारहाण!
देशभरात एकूण २२ ते २५ कोटी चालक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच ऑटो रिक्षा चालकांचा समावेश आहे. या चालकांच्या अनेक वर्षांपासून विविध मागण्या आहेत. त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून या मागण्या मान्य करण्यासाठी आता देशभरातील चालकांच्या ७५० संघटना एकत्रितपणे जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत.
अनेक ठिकाणी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारून सेवा स्थगित केली आहे. परंतु हे आंदोलन करत असताना कोणत्याही शासकीय, सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ देऊ नये. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.
संघटनेच्या मागण्या
- अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा.
- देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.
- सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा.
- दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे.
देशभरामध्ये ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो सह सर्व प्रकारचे २५ कोटी चालक, मालक आहेत. या घटकांना कोणती सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी. यासाठी केंद्र सरकारने वेलफेअर बोर्ड आणि राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.
लोणी येथील पेट्रोल, डिझेल वाहतूक धारकांचा संप स्थगित. तीन जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयी निर्णय घेणार असल्याचेही ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.