‘कोण कुठल्या पक्षात कधी घुसेल..’; नितीन गडकरींचं राजकीय स्थितीवर परखड भाष्य
![Nitin Gadkari said that no one can say who will enter which party when](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Nitin-Gadkari-1-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा आहे. आमदार-खासदार असे लोकप्रतिनिधी सर्रासपणे पक्षबदल करण्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. यावरून, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी सध्याच्या राजकीय स्थितीविषयी बोलताना पक्षबदल करणाऱ्या लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या.
नितीन गडकरी म्हणाले, प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार आपल्या शाळांमधून, गुरुंकडून जे संस्कार मिळतात, त्यातून माणसाला जीवन दृष्टीकोन प्राप्त होतो. आज दुर्दैवाने ना उजवे, ना डावे, आपण संधीसाधू हेच राजकारणातलं सूत्र आहे. कोण कुठल्या पक्षात कधी घुसतात, कधी बाहेर जातात, कुठे जातात हे कुणीच सांगू शकत नाही.
हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर
राजकीय पक्षाचा आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सगळ्याच क्षेत्रातली समस्या आहे. जोपर्यंत जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल, तोपर्यंत नेतेही तसेच येतील. जेव्हा जनता जागृत होईल, या सगळ्या गोष्टींना महत्व देईल आणि निवडणुकीत विचार करून मतदान करेल तर आपोआप परिवर्तन होईल, असं नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरींनी बोलताना कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते ए. बी. बर्धन यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख ए. बी. बर्धन यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. ते खूप विद्वान होते. आयुष्यभर ते कम्युनिस्ट पक्षात होते. पण त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. एखाद्या माणसाचे विचार कदाचित तुम्हाला पटत नसतील. पण त्या विचारांशी प्रामाणिक राहून आयुष्यभर त्याची किंमत चुकवून त्यासाठी जगणारे लोक आजही आपल्या समाजासाठी आदर्श आहेत.