पुण्यात मराठी पाटी नसणाऱ्या दुकानांची मनसेकडून तोडफोड
![Shops without Marathi boards in Pune vandalized by MNS](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/MNS-Pune-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असणे आवश्यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दुकान, हॉटेलवर असणार्या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिक आंदोलन करीत आहे. आमच्या भूमिकेची दखल न्यायालयाने देखील घेतली.
हेही वाचा – ‘५४ आमदार आणि खासदारांनीही कागदावर सह्या केल्या’; छगन भुजबळांचा दावा
राज्यातील दुकान, हॉटेल यावरील मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर आज आम्ही आंदोलन केले आहे. ही आंदोलनांची सुरुवात आहे. पण भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील यावेळी साईनाथ बाबर यांनी दिला. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.