सचिन किंवा सेहवाग नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे गौतम गंभीरचा आवडता बॅटिंग पार्टनर; स्वत: केला खुलासा
![Gautam Gambhir said that MS Dhoni was my favorite cricket partner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Gautam-Gambhir-780x470.jpg)
Gautam Gambhir : भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील त्याच्या आवडत्या बॅटिंग पार्टनरबद्दल सांगितले आहे. त्याने सचिन तेंडुलकर किंवा वीरेंद्र सेहवाग नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आहे.
गौतम गंभीर म्हणाला, लोकांना वाटते की वीरेंद्र सेहवाग त्याचा आवडता फलंदाज साथीदार होता, पण तसे नाही. महेंद्रसिंग धोनीबरोबर फलंदाजी करताना, विशेषत: झटपट क्रिकेटमध्ये तो नेहमीच आनंद घेत असे. २०११च्या विश्वचषकामधील अंतिम सामन्यात गंभीर आणि धोनीने १०९ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली होती. या भागीदारीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध विजेतेपद पटकावले, ज्यामध्ये गौतम गंभीरने ९७ धावा केल्या आणि धोनीने नाबाद ९१ धावा केल्या.
हेही वाचा – AIMIM नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्याला धमकावलं; म्हणाले..
माझा आवडता क्रिकेट साथीदार एम.एस. धोनी होता. लोकांना वाटतं की माझा आवडता फलंदाजी साथीदार वीरेंद्र सेहवाग होता, पण खरं तर मला धोनीबरोबर खेळायला जास्त आवडलं, विशेषत: टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये. आम्ही एकत्र मिळून अनेक मोठ्या भागीदारी केल्या आहेत. मी धोनीबद्दल नक्कीच बोलतो, पण मी कधी त्याच्यावर रागावलेलो नाही, असं गौतम गंभीर म्हणाला.
लोक नेहमी एम.एस. धोनी आणि कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल बोलतात, जे अगदी खरे आहे, परंतु मला वाटते की कर्णधारपदामुळे त्याने त्याच्यातील फलंदाजाचा त्याग केला. नाहीतर तो फलंदाजीत खूप काही साध्य करू शकला असता, जे त्याने केले नाही. जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा असेच होते, कारण त्यावेळी तुम्ही संघाला पुढे नेत असता आणि स्वतःला विसरता. हेच रोहित शर्माने विश्वचषक २०२३मध्ये केले, असंही गौतम गंभीर म्हणाला.