७० वर्षे आमचं झालेलं नुकसान सरकार कसं भरून काढणार? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल
![Manoj Jarange Patil said how the government will compensate for the loss we have suffered for 70 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Manoj-Jarange-Patil-5-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांची आज सातारा येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठ्यांना आरक्षण असतानाही पुरावे लपवून ठेवण्यात आले. समित्यांनी पुरावे शोधण्याचं काम केलं. पण, सरकारकडे अहवाल आल्यावर पुरावे नसल्याचं सांगितलं जायचं. मग, आता कसं काय पुरावे आढळत आहेत? याचं उत्तर सरकारने द्यावे, असं आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्यांनी आरक्षण समजून घेतलं, त्यांच्या पिढ्या सुधारल्या. मराठ्यांना ७० वर्षापासून आरक्षण होतं. पण, जाणूनबुजून षडयंत्र रचण्यात आलं. ७० ते ७५ वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही. आमचं आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? आरक्षणासाठी आमच्या तरूणांचे मुडदे पडत आहेत.
हेही वाचा – संभाजीराजे तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? छगन भुजबळांचा सवाल
आता लाखांनी नोंदी आढळून येत आहेत. मराठ्यांना दोन अंग आहेत. मराठा क्षत्रिय असल्याने त्यांना लढायचं सुद्धा माहिती आहे. मराठा समाज शेतीही करतो. पण, मराठ्यांची मुलं मोठी झाली, तर आपलं काय होणार? म्हणून षडयंत्र रचण्यात आलं आहे. मराठ्यांना आरक्षण असतानाही पुरावे लपवून ठेवण्यात आले. समित्यांनी पुरावे शोधण्याचं काम केलं. पण, सरकारकडे अहवाल आल्यावर पुरावे नसल्याचं सांगितलं जायचं. मग, आता कसं काय पुरावे आढळत आहेत? याचं उत्तर सरकारने द्यावे, असं जरांगे पाटील म्हणाले.
सत्तर वर्षे आमचं झालेलं नुकसान सरकार कसं भरून काढणार आहे? आमच्या जागा कुणी बळकावल्या? २४ डिसेंबरला सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा तयार करणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी गाफील राहू नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.