भोसरीतील ६६ वर्षीय सायकलस्वाराचे प्रेरणादायी “महाराष्ट्र दर्शन”
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडून उपक्रमाचे कौतूक
![Inspiring Maharashtra darshan of a 66-year-old cyclist from Bhosari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Mahesh-Landge-780x470.jpg)
३६ जिल्ह्यांमध्ये ६६ दिवसांचा प्रवास, आळंदीत अभियानाचा समारोप
पिंपरी । प्रतिनिधी
केवळ आपला महाराष्ट्र न म्हणता प्रत्यक्ष महाराष्ट्र पाहून त्याला गवसणी घालण्याचे स्वप्न ६६ वर्षांच्या प्रकाश पाटील यांनी पाहिले. ६६ दिवसांत ३६ जिल्ह्यांचा सायकलवरून प्रवास करण्याचा अनोखे अभियान त्यांनी सुरू केले. हा प्रवास त्यांनी यशस्वी पूर्णही करून दाखविला. नुकतेच आळंदी येथे त्यांच्या या उपक्रमाचा समारोप झाला. या प्रवासादरम्यान आरोग्य, पर्यावरण रक्षण आदी संदेश युवकांमध्ये देखील रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे आमदार महेश लांडगे यांनी कौतूक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा पदस्पर्श झालेली ही पावन भूमी आहे. तसेच छत्रपती शिवरायांनी घडविलेल्या मावळ्यांचा आणि स्वराज्याचा हा प्रांत आहे. त्यामुळे महाराष्ट्राविषयी अभिमान असल्याचे अनेक जण सांगत असतात. मात्र केवळ अभिमान असून उपयोग नाही. तर हा महाराष्ट्र नेमका कसा आहे, हे प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी सायकलवरून भ्रमंती करण्याचे ध्येय प्रकाश पाटील यांनी पाहिले. त्यानुसार महाराष्ट्रातील ३६ जिल्हे फिरण्याचे स्वप्न त्यानीं पाहिले. २७ ऑगस्ट २०२३ रोजी भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी या भ्रमंतीला सुरूवात केली.
हेही वाचा – WhatsApp Updates : वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲपने आणले ‘हे’ नवीन फिचर
कामगार नेते सचिन लांडगे यांच्या उपस्थितीत सायकल अभियानाला सुरुवात झाली होती. त्यानंतर रायगड, नवी मुंबई, जूनी मुंबई, ठाणे, पालघर, नाशीक, नंदूरबार, धुळे, जळगाव आदीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश केला. प्रत्येक जिल्ह्यात असणार्या तिथल्या वैशिष्ठ स्थळांना भेटी दिल्या.
तसेच, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी पर्यावरण व सायकलचे महत्व पटवून दिले. सायकल का चालवावी, या विषयांवर महाराष्ट्र भर संदेश देण्याचे काम पाटील यांनी केले. गड, किल्ले पौराणिक मंदीरे अशा ठिकाणी भेटी देऊन प्रत्येक जिल्हातील सायकल मित्रांच्या भेटी घेतल्या. सायकल विषय एक दृढ नाते निर्माण करण्यासाठी पाटील यांनी सर्वत्र संदेश दिला. ६६ दिवसात ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण सायकलवरून ५ हजार ७०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. तर ६१५ किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय ध्येयवेड्या माणसाचाच असू शकतो, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
दत्त गडावर प्रत्येक जिल्ह्याचे नावाने वृक्षारोपण..
या प्रवासादरम्यान पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यातून माती व पाणी घेऊन आले आहेत. त्या त्या जिल्हाच्या नावाने दिघी येथील दत्त गडावर वृक्षारोपण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या आराखडा (मॅप) प्रमाणे प्रत्येक शहराच्या नावाने वृक्ष लागवड त्याच जिल्ह्याच्या व्यक्तीच्या हातून करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नवीन वृक्ष मित्राची भर पडेल, असे प्रकाश पाटील म्हणाले.
सध्याच्या युगात सर्वांनी आरोग्य जपले पाहिजे. विशेषतः तरुणांनी त्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. या बरोबरच पर्यावरणाचा र्हास रोखणे ही आपली जबाबदारी आहे. माझ्या सायकलवरून केलेल्या भ्रमंतीवेळी हा संदेश युवकांमध्ये रुजविण्याचे काम मी केले. तसेच केवळ आपला महाराष्ट्र असे न म्हणता प्रत्यक्ष महाराष्ट्राला पाहून घेण्याच्या माझ्या जी जिद्दीने मी सायकलवरून ही भ्रमंती केली.
प्रकाश पाटील, सायकल मित्र, पुणे.