महाराष्ट्रात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४० गुन्हे दाखल, १६७ जणांना अटक
![Rajnish Sheth said that 140 cases were registered and 167 people were arrested in Maharashtra between October 24 and 31](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Rajnish-Sheth-780x470.jpg)
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १६७ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ३०७ कलमांतर्गत ७ गुन्हे दाखल केले आहेत. बीड शहरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच, बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालन्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा – हॅलोवीन जगभरात साजरा का केला जातो? काय आहे इतिहास? वाचा सविस्तर..
महाराष्ट्रात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील १६७ जणांना अटक, तर १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात १२ कोटी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. १७ एसआरपीएफच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. बीडमध्ये ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’ दाखल झाली आहे. राज्यात अतिरिक्त ७ हजार होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत, असं रजनीश सेठ म्हणाले.
कायद्याचं उल्लंघन आणि जाळपोळ करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करेल. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत, असंही रजनीश सेठ म्हणाले.