‘थोडा वेळ म्हणजे सरकारला किती वेळ द्यायचा?’ मनोज जरांगे पाटलांचा सवाल
![Manoj Jarange Patil said that a little time means how much time should be given to the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Manoj-Jarange-Patil-1-4-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितला आहे. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवा आणि त्याविषयीचे निर्देश द्या अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांचा फोन काही वेळापूर्वी आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ आम्हाला द्या. त्यावर विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्ही थोडा म्हणजे किती वेळ द्यायचा? आम्ही ४० वर्षे थांबलो आहोत. थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ द्यायचा? त्यामुळे आता मुदतवाढ देण्यास आमचा विरोध आहे.
हेही वाचा – ‘आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या’; सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नार्वेकरांना सुनावले
१ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्ही मराठा समाजाच्या मागणीबाबत आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना बोललात का? याचं उत्तर आलेलं नाही.याचा अर्थच असा होतो की केंद्र सरकारला तुम्ही काहीही सांगितलं नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते तरीही त्यांच्याशी संवाद साधला नाही हा प्रश्न सांगितला नाही मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा? क्युरेटिव्ह पिटिशन १३ ऑक्टोबरलाच दाखल झाली आहे. त्यानंतर १६ तारखेला आपण विचारलं होतं. पण पंतप्रधानांना काही माहीत असतं तर पंतप्रधानांनी शिर्डीत उल्लेख केला असता. आमचं आंदोलन शांतेत सुरु आहे. मात्र हे शांततेचं युद्ध सरकारला परवडणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.