पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत ६०४ कोटी रुपयांचा महसूल
चालू आणि थकबाकी वसूलीचा वाढता आलेख
![A revenue of Rs 604 crores in the treasury of Pimpri-Chinchwad Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Pimpri-Chinchwad-2-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांत कर वसुलीची नवं-नवीन विक्रम केले आहेत. यामध्ये वर्षानुवर्षे करदात्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. हा थकीत कर वसूल करण्यात महापालिकेच्या कर संकलन विभागाला यश आले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल साडेतीनशे कोटी तर २०२३-२४ या आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात तब्बल २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. आत्तापर्यंत चालू आर्थिक वर्षात महापालिका इतिहासात प्रथमच ६०४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख ७ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. या विभागाच्या वतीने विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे २०२३-२४ च्या साडेसहा महिन्यात ६०४ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार तत्काळ थकीत कर भरत आहेत.
हेही वाचा – भारताची पॅलेस्टाइनला सढळ हाताने मदत, औषधांसह पाठवले ३२ टन साहित्य
शहरातील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. थकबाकी वसूल होत नसल्याने दरवर्षी हा आकडे वाढतच होता. मात्र, या विभागाची जबाबदारी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी थकबाकी वसुलीसाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्म नियोजन, आराखडा तयार केला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी वसूलीचा आलेख उंचावत आहे. थकबाकीदारांची चालू कर आणि थकीत कर भरण्याकडे कल वाढत असल्याने २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये आतापर्यंत तब्बल ५५५ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवासीसह बड्या थकबाकीदार बिगर निवासी मालमत्ता धारकांकडून कर वसूल केला आहे.
महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत असतानाही अनेकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने ४१ हजार, ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल ६०० कोटी रुपयांचा कर थकीत आहे.
असा आला रूपया..
- ऑनलाईन : ३८० कोटी ६ लाख
- विविध ॲप : ५ कोटी २४ लाख
- रोख : ७८ कोटी २५ लाख
- धनादेशाद्वारे : ६२ कोटी १ लाख
- आरटीजीएस : ३२ कोटी ९२ लाख
- इडीसी : ६ कोटी ९७ लाख
- एनईएफटी : ४ कोटी ८९ लाख
- डीडी : ४ कोटी ५३ लाख