‘..त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार’; सुप्रिया सुळेंचा इशारा
![Supriya Sule said that she will correct the lawyer's program](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/supriya-sule-1-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. काही दिवसांपुर्वी निवडणूक आयोगासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी तर अजित पवार गटाकडून वकील मनिंदर सिंह यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे गटाने खोटंनाटं करून उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष काढून घेतला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर अन्याय झाला की नाही? त्यानंतर आता शरद पवारांचा पक्ष बळकावू पाहत आहेत. शरद पवारांचा कोणी काका-मामा राजकारणात नव्हता. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष काढला आहे. यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे.
हेही वाचा – शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग; ‘या’ दिवशी होणार सुनावणी
सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला. या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण आहे? तर, तो चेहरा म्हणजे शरद पवार, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता त्यांचा पक्ष ओरबाडू पाहत आहेत. त्यासाठी काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाची नोटीस त्यांनी पाठवली, आम्ही अशी नोटीस पाठवली नाही. त्यामुळे पहिला वार त्यांनी केला, आम्ही केला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे झाल्यानंतर निवडणूक आयोगासमोर आपल्या पक्षाबाबत चर्चा होती. शरद पवार स्वतः तिथे हजर होते. ८३ वर्षांचे शरद पवार यासाठीच मुंबईवरून दिल्लीला गेले. स्वतः ज्या बाळाला जन्म दिला, त्या बाळासाठी शरद पवार तिथे जाऊन बसले. परंतु, ज्यांना पक्ष हवा आहे, ते लोक तिथे नव्हते. त्यांच्यापैकी कोणीच तिथे आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील ते मी बघणार आहे आणि मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण तो वकील काय म्हणाला? ‘तो शरद पवार’ असा उल्लेख त्याने केला. शरद पवारांना ‘तो शरद पवार’ म्हणणारा तू कोण आहेस? आता वकिली कर, तुझा करेक्ट कार्यक्रम आज ना उद्या नाही केला, तर शरद पवाराची मुलगी नाव नाय लावणार, लक्षात ठेव, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.