राष्ट्रवादीबाबत सुनावणी संपली; वाचा दोन्ही गटांचा युक्तीवाद..
![Hearing on NCP ends; Read the argument of both groups..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/sharad-pawar-and-ajit-pawar-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीसाठी स्वत: शरद पवार हे उपस्थित होते. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली. सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.
अजित पवार गटाचा युक्तिवाद
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती बेकायदेशीर आहे. तर सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावा अजित पवार गटाने केलाय. पक्षाचं कामकाज कसं चालतं, काय सुरुय, काय-काय घडलंय, याबाबत माहिती देण्यात आलीय. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आणि लोकप्रतिनिधींचं संख्याबळ महत्त्वाचं आहे. 30 जूनला अजित पवारांची बहुमानं अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला आहे.
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात. जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच करण्यात आली होती. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. एकाच सहीवर नियुक्ती केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील ५३ आमदारांपैकी ४३ आमदार आमच्यासोबत आल्या आहेत. तसेच विधान परिषदेच्या ९ पैकी ६ आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेचे एक आणि राज्यसभेचा एक खासदार आमच्यासोबत आहे. तसेच नागालँडचे सर्व सात खासदार आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. १ लाख ६२ हजार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी शासनाची समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर
शरद पवार गटाचा युक्तीवाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केलाय. त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. राज्य आणि बाहेर हा पक्ष कुणाचा आहे ते सर्वांना माहिती आहे. अजित पवार यांच्या गटाची भूमिका ही पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे. अजित पवार यांच्यासह ९ जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे पत्र पाठवलं आहे. तसेच पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही.
विधीमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे. पक्षामध्ये कुठेही फूट नाही. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडे आहे, असा दावा शरद पवार गटाने केलाय. २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी केला आहे.