ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव 2023ः गणेशोत्सवाचा इतिहास आणि संस्कृती

पुणेः १८९४ साली विंचूकर वाड्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. तर भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती ,असे रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात. परंतु इतिहासाचे अभ्यासक मंदार लवटे यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात १८९३ ला झाल्याचे मत मांडले आहे.
ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये असलेली देशप्रेमाची भावना वाढण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आता या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे विविध स्पर्धांचे आयोजन केले.

लोकमान्य टिळकांच्या काळात गणपतीला देशा-परदेशांत महत्त्व प्राप्त झाले. त्याअगोदर गणपती ही देवता परदेशात स्थानापन्न झालेली होतीच. तिबेट आणि तुर्कस्तान या प्रदेशात आध्यात्मिक मठांचा रक्षणकर्ता म्हणून तो द्वाररक्षक झाला. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आपले वर्ष विविध सण-समारंभांशी जोडले आहे. आता साजरा होणारा गणेशोत्सव याला अपवाद नाही. अर्थात, पूर्वीच्या खूप साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे रूप बदलले आहे. त्याला एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरणाची, जागतिकीकरणाची, भांडवलशाहीची आणि जाहिरातबाजीची बाधा झाली आहे. आताच्या सार्वजनिक उत्सवाची काहीशी बीजे आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगात दिसतात.

प्राचीन काळातील आर्य-आर्येतर देवता, बौद्धमतवाद, चिनी यात्रेकरूंच्या माध्यमातून गणपतीचा परदेशातील प्रवास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मध्य युगात संपूर्ण हिंदुस्थानभर ज्या मराठी सत्तेचा दबदबा होता, त्याचे प्रमुख कारभारी पेशवे हे छत्रपतींच्या अनुमतीने सत्ता गाजवत होते. त्यांचे आराध्यदैवत गणपती. शनिवारवाड्यातील गणेश महाल काय किंवा थोरले माधवराव पेशवे यांनी आपले अंतिम दिवस थेऊर येथे गजाननाच्या चरणी व्यतीत करणे काय, या गोष्टी पेशव्यांच्या राजवटीतील या दैवताचे मोठेपण स्पष्ट करणाऱ्या आहेत. पेशव्यांच्या दरबाराचे एकमेव (इंग्रज चित्रकाराने काढलेले) चित्र जे उपलब्ध आहे, त्यातही गणपती स्पष्ट दिसतो.

सवाई माधवरावांच्या आयुष्यातील ज्या गोष्टी महत्त्वाच्या घडल्या, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव. या पेशव्यांनी या घरगुती उत्सवाला मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या न्यायाने दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. पेशव्यांचे विश्वासू पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार यांनी या उत्सवामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शनिवारवाड्यातून दशमीला फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजही त्याचप्रमाणे वाटचाल सुरू आहे.
चिनी विद्वान नालंदाला शिकायला आले. ते जाताना भारतीय संस्कृती आणि गणपती मायदेशी घेऊन गेले. चीन आणि जपानमध्ये गणपतीला ‘कांगि-तेन’ म्हणत. ब्रह्मदेश, सयाम, कंबोडिया, जावा, बार्ली, बोर्निओ, तुर्कस्थान, मेक्सिको या देशांतही गणपती पोहोचला. बालीमध्ये पूर्वी गणेशाची पूजा करून तेथील राजा-राणीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मूर्ती बनवून त्या गणेशाच्या उजव्या बाजूला स्थापन करीत असत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button