जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठमध्ये ‘गुरुपुजन सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित, जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ “मुक्त संगीत शिक्षण विभाग” टाळगाव चिखली येथे मुक्त संगीत शिक्षण विभाग प्रमुख तसेच संतपीठ संचालक ह.भ.प. श्री. राजू महाराज ढोरे, व डॉ.सौ.स्वाती मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता ‘गुरुपूजन सोहळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पूजनीय उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष-देहु संस्थान), ह.भ.प.श्री. बाजीराव नाना चंदिले (सरचिटणीस तथा अध्यापक वा.शि.सं. आळंदी), महंत ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज जगताप (वाणीभूषण बारामती, अभ्यासक संतपीठ), ह.भ.प.श्री. स्वामी हनुमान चैतन्य (अध्यापक वा.शि. संस्था, आळंदी), मा.श्री. विजयजी थोरात ( उपायुक्त पिं. चिं. म.न.पा.), डॉ. भावार्थ देखणे सर (सदस्य सांस्कृतिक समिती संतपीठ), संतपीठ चिंतन समिती सदस्य, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी स्विकृत नगरसेवक संतोष भाऊ मोरे व दिनेश भाऊ यादव त्याचप्रमाणे चिखली ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ याच्या उपस्थितीत संपन्न झाला.
संतपीठ हे विद्यार्थ्यांना संस्कार देणारे, त्यांचे जीवन घडवणारे असे हे ज्ञानपीठ आहे. संस्कृत, हिंदी, मराठी व इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व मिळवून संतांची महती साता-समुद्रा पार संतपीठाच्या विद्यार्थ्यांनी पोहोचवावी ही ह.भ.प.श्री. राजू महाराज ढोरे यांची इच्छा आहे. असे मत ह.भ.प.श्री. बाजीराव नाना चंदिले यांनी व्यक्त केले. महंत ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज जगताप यांनी ज्ञान पाहिजे असेल तर गुरु जवळ जावे लागते.
हेही वाचा – आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील मंत्र्याची गुप्त भेट? राजकीय चर्चांना उधाण
“गुरु देती ज्ञान दर्शनी समाधान”
असे त्यांनी गायकवृंदाना प्रेमाने आणि आत्मियतेने सांगितले की, गायनाचा प्रवास आरोह -आवरोहने होतो, परंतु अभिजात ज्ञान मिळवल्यानंतर संगीताचा प्रवास तो गायक गाईल तो राग तयार होतो. त्यासाठी ज्ञानग्रहण करण्यासाठी, आत्मदर्शन होण्यासाठी गुरुकडे जाणे गरजेचे आहे. गुरुचे महत्व यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
सदगुरुवांचोनी सापडेना सोय | धरावे ते पाय आधी आधी ||
गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय. हे मार्गदर्शन घेऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरावयाचे असतात. परमार्थात श्रवण व सदगुरू यांना फार महत्त्व आहे. सदगुरूंशिवाय गती नाही, तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. सदगुरू मुखातून शुद्ध श्रवण घडल्याशिवाय साधकाच्या अंत:करणात नामाची गोडी निर्माणच होत नाही. असे मत ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष- देहू संस्थान) यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात व्यक्त केले.
त्यावेळी ‘ मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण’ विभागाच्या विद्यार्थ्यांनी हार्मोनियम ,तबला, पखवाज या वाद्याचे अतिशय सुंदर असे सादरीकरण केले. मुक्त शिक्षणविभागाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुस्वर वाणीतून आपले स्वानुभव सांगताना त्यांनी त्यांच्या जीवनाला एक गती मिळाली असून गायन, पखवाज, तबला त्याचप्रमाणे कीर्तन, प्रवचन हे शिक्षण खूप दर्जेदार व उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षण ‘मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण’ विभागातर्फे मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानुन त्यांच्या अध्यापकांचे ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह .भ .प .प्रा.ज्ञानेश्वर गाडगे सर (अभ्यासक संतपीठ) यांनी केले,तसेच सौ.स्नेहल पगार (प्रभारी मुख्याध्यापिका, संतपीठ) यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.