भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक ध्येये पादाक्रांत केली आहेत : अनिता काटे
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात
![India, Different Sectors, Many Goals, Padakrant, Kelly, Are, Anita Kate, Pimple Saudagar, Challenger, Public School, Country's Independence Day, In Excitement,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/15-August-780x470.png)
पिंपरी : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाले. देशाची वाटचाल खूप उल्लेखनीय असून भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक ध्येये पादाक्रांत केली आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर देखील स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेले आहे. आज देशात अनेक क्षेत्रात प्रगती झाली असतानाच जातीपातीची बंधनं झुगारून भारताने देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिलेला विराजमान केले आहे, हेच आपल्या देशाच्या यशाचे मोठे उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी साधी टाचणी बनविण्यास पात्र नसणारा आपला देश आज चंद्र-मंगळ मोहीमाद्वारे आकाशाला गवसणी घालत आहे, असे प्रतिपादन चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्षा सौ. अनिताताई संदीप काटे यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या इमारतीच्या प्रांगणात सौ. अनिताताई काटे आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी चॅलेंजर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष उद्योजक संदीप काटे, संतोष भूळगे, श्रीकांत नायक, पालक प्रतिनिधी डॉ. अशोक लांडगे, अमोल गाडेकर, आबा पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेत अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ असा नारा देत इमारतीच्या प्रांगणात प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी पालकवर्ग भारावून गेला होता. विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्यास पालकांनी टाळ्यांची साद दिली.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांनी या पालकवर्गाशी संवाद साधत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मानसी साळुंखे, रचना शेळके व मनस्वी मिश्रा या विद्यार्थीनिंनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची मदत केली. देवयानी शिंदे, दिप्ती बक्षी, सीया सरदेसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.