एकत्र कुटुंब पद्धती टिकवण्यासाठी मध्य प्रदेशात अभ्यासक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/joint-family.jpg)
भोपाळमधील बरकतुल्ला विद्यापीठाने सामाजिक व नैतिक मूल्यांवर आधारित एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचा तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे.
कुलगुरू डी.सी.गुप्ता यांनी सांगितले, की पुढील शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यात एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाणाऱ्या मुलींना जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय यांचा विचार करण्यात आला आहे. एकत्र कुटुंब पद्धती जास्त चांगल्या प्रकारे चालावी हा या अभ्यासक्रमाचा हेतू असून मुलींना त्याचा फायदा होईल असे गुप्ता यांचे म्हणणे आहे.
हा अभ्यासक्रम केवळ सुनांसाठी नाही, पण त्याचा फायदा त्यांना जास्त होईल. मुलांनाही हा अभ्यासक्रम खुला असून त्यांनाही एकत्र कुटुंबात कसे वावरावे याचे शिक्षण दिले जाईल. या अभ्यासक्रमाची रचना मानसशास्त्र व महिला अभ्यास विभाग करणार असून त्यावर काम सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी तीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून त्यात सामाजिक व नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जाईल. किरकोळ कारणावरून एकत्र कुटुंबे फुटत आहेत त्यामुळे ती एकत्र ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल.
महिला अभ्यास विभागाच्या प्रमुख आशा शुक्ला यांनी सांगितले, की अशा अभ्यासक्रमाची आपल्याला काही माहिती नाही. आम्ही असा कुठलाही प्रस्ताव पाठवलेला नाही , त्याबाबत काही चर्चाही झालेली नाही. भाजप प्रवक्ते राजो मालविय यांनी या अभ्यासक्रमाचे स्वागत केले असून भारतातील कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी हे चांगले पाऊल आहे, महिला हा कुटुंबाचा कणा आहे व त्याच कुटुंबाला मूल्ये शिकवू शकतात, असे ते म्हणाले, काँग्रेसने यावर टीका केली असून ही नौटंकी असल्याचे म्हटले आहे. मध्यप्रदेश काँग्रेसच्या शोभा ओझा यांनी सांगितले की, मूल्ये ही कुटुंबातून विकसित होतात. विद्यापीठांनी व्यावसायिक अभ्यासक्रम चालवावे, अनेक लोक बेरोजगार आहेत. महिलांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम हवेत.