पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी कामगिरी! ९० दिवसांत ४४७ कोटींची वसूली
![447 crores recovery of Pimpri-Chinchwad Municipal Corporation in 90 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/pcmc-mahanagarpalika-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने मोठी कामगिरी केली आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने ९० दिवसांत करदात्यांकडून तब्बल ४४७ कोटी रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. तर प्रामाणिकपणे कर भरून शहरविकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख २ हजार २०३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे २०२३-२४ च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच ४४७ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
हेही वाचा – ‘समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झाला की म्हणतात देवेंद्रवासी झाला’; शरद पवारांचा टोला
६ लाख २ हजार २०३ मलमत्ता धारकांपैकी ३ लाख ३ हजार ३५० मालमत्ता धारकांनी म्हणजे ५० टक्के मालमत्ता धारकांनी तीन महिन्यात कराचा भरणा केला आहे. यांनी तब्बल ४४७ कोटी ३ लाख ९६ हजार रूपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
असा कर जमा झाला..
- ऑनलाईन : २९१ कोटी ८१ लाख
- विविध अॅप : ४ कोटी ६८ लाख
- रोख : ५२ कोटी ४७ लाख
- धनादेशाद्वारे : ३७ कोटी ७४ लाख
- इडीसी : ४ कोटी ८ लाख
- आरटीजीएस : २१ कोटी ७० लाख
- डीडी : १ कोटी ३६ लाख
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर संकलनासाठी शहरात १७ झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक ३९ हजार ६००, सांगवीमध्ये ३४ हजार ६९४, चिंचवडमध्ये २९ हजार ३०३, थेरगावमध्ये २८ हजार ३६८ मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे, तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये ४ हजार १३१ मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.