आंतरराष्ट्रीय योग दिन : माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी दांपत्याची पाण्याखाली योगाची प्रात्यक्षिके!
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य तेरा फूट पाण्याखाली २२ मिनिटे योग
![Ex-Marine Commando Ravi Kulkarni Couple Underwater Yoga Demonstrations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Ravi-Kulkarni--780x470.jpg)
उरण (नवी मुंबई) : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून उरण मधील माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी योगप्रशिक्षिका विदुला यांनी तेरा फूट पाण्याखाली २२ मिनिटे योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. पाण्याखालील अशा प्रकारची प्रात्यक्षिके हा देशातील बहुतेक पहिलाच विक्रम असावा, असे रवी कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिके यशस्वी पार पडल्यानंतर सांगितले. येथील श्री बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल मध्ये शेकडो योगप्रेमींनी हा थरार अनुभवला.
पाणबुड्यासाठी लागणाऱ्या डायव्हिंग साहित्याचा अचूक वापर करून या दांपत्याने पाण्याखाली दाखवलेल्या योगाच्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.ओंकार, प्रार्थना आणि सूर्यनमस्कारांनी प्रारंभ करून कुलकर्णी दांपत्याने या प्रात्यक्षिकांना सुरुवात केली. प्रत्यक्षात, ड्रायव्हिंग इक्विपमेंट मुळे पाण्याखाली स्थिर राहणे बऱ्यापैकी अवघड जात होते. पण, या कुलकर्णी दांपत्याने गेले काही दिवस निष्ठेने आणि चिकाटीने सराव केल्यामुळे त्यांनी पाण्याखाली स्थिर राहून आपले लक्ष्य साध्य केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Image-2023-06-21-at-18.48.44.jpeg)
हेही वाचा – PCMC : सोसायट्यांचा पाणी प्रश्न सोडवा; अन्यथा अधिकाऱ्यांना गोट्या वाटप कार्यक्रम!
त्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये पर्वतासन , त्रिकोणासन, वीरभद्रासन, वृक्षासन, नटराजासन, देवीची पोझ या उभ्याने करण्याच्या आसनांचा समावेश होता. त्याचप्रमाणे बसून किंवा विशिष्ट पोझ मध्ये करण्याच्या पर्वतासन, सिंहासन, भुजंगासन, शलभासान, पद्मासन या आसनांची देखील त्यांनी प्रात्यक्षिके दाखवली. त्यानंतर पाण्याखाली मेडिटेशन करून तसेच ओंकार आणि श्लोक म्हणून त्यांनी प्रात्यक्षिकांची यशस्वी सांगता केली.
तेरा फूट पाण्याखाली तब्बल २२ ते २५ मिनिटे योगाची ही प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर त्यांनी वर घेऊन सगळ्यांना अभिवादन केले. योगदिना चे औचित्य साधून ही अनोखी प्रात्यक्षिके सादर केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. या प्रात्यक्षिकांदरम्यान त्यांना माजी मरीन कमांडो विनोद कुमार, आणि राम सवार पाल यांचे सहकार्य मिळाले. प्रीतम पाटील यांनीही मोठे साहाय्य केले. माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी यांनी पाण्याखाली अद्भूत, अनोखे आणि जगाविरहित विक्रम नोंदवण्याची परंपरा कायम ठेवली. त्यांचा हा तिसरा विक्रम नोंदवला गेला. यापूर्वी त्यांनी २००३ मध्ये ” पाण्याखालचा लग्न सोहळा ” आयोजित करून विश्व विक्रम साजरा केला होता. गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.१५ ऑगस्ट रोजी सहा जणांच्या साथीने पाण्याखाली संचलन, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत गाऊन हे जागतिक विक्रम केला होता. आणि आता योगदिनाचे औचित्य साधून तेरा फूट पाण्याखाली २२ मिनिटे योगासनाची अफलातून प्रात्यक्षिके सादर केली.