राज्य सरकारकडून मेंढीपालनासाठी दहा हजार कोटींची कर्ज योजना प्रस्तावित?
![Ten thousand crore loan scheme proposed by the state government for sheep farming](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/sheep-farming-780x470.jpg)
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मतांवर लक्ष ठेवत शिवसेना-भाजप सरकारने मेंढीपालन वाटपाची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित केली आहे.तेलंगणा सरकारच्या धर्तीवर धनगर समाजासाठी मेंढ्या वाटपासाठी दहा हजार कोटींची योजना जाहीर करण्याच्या तयारीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आहे.
मात्र तेलंगणा सरकारने ७५ टक्के अनुदान देऊन लोकप्रिय केलेली ही योजना राज्यात मात्र ५० टक्के कर्ज, २५ टक्के अनुदान, २५ टक्के लाभार्थींच्या सहभागासह राबविली जाणार आहे. पशु व दुग्ध विकास विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतीच तेलंगणला भेट देऊन मेंढ्या वाटप योजनेची माहिती घेतली आहे. तेलंगणच्या धर्तीवर धनगर समाजासाठी ही योजना राबविण्याचे या विभागाने निश्चित केले आहे.
हेही वाचा – WTC फायनलपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू झाला बाहेर
ही योजना राबविताना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळेच तेलंगणच्या धर्तीवर ७५ टक्के अनुदान देणे राज्य सरकारला परवडणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच राज्य सरकारने ही योजना बदलली आहे.