गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/4eff542369c995e30e03de26ea88aae1.jpg)
शहरात 48 विसर्जन घाट: घाटावर हौद, निर्माल्य कुंडाची सोय
पिंपरी – शहरामध्ये मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होत असून दीड दिवसापासून गणेश विसर्जनही सुरु होते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत एकूण 48 प्रमुख विसर्जन घाट करण्यात आले आहेत. त्याबरोबर नदीवरील घाट, विहिरी, तलावांबरोबर हौद व टाक्यांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी घाटांवर महापालिका कर्मचारी जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. तर, आगमनानंतर सर्वात कमी कालावधीसाठी असलेल्या दीड दिवसाच्या गणरायाचे शुक्रवारी (दि.14) विसर्जन होईल. नंतर पाचव्या, सातव्या, दहाव्या आणि गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात सहा प्रभागामध्ये नदी व तलावांवरील एकूण 48 विसर्जन घाट आहेत. त्याबरोबर 2 खाणी, 1 विहिर, 32 कुत्रीम विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी हौद आणि टाक्यांमध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकण्यात येणार आहे.
कचरा टाकण्यासाठी 38 निर्माल्य कुंड, 22 निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. जमा होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जावा. यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेचे कामगार नेमले आहेत. जागेवरच कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. तसेच, प्रभागनिहाय जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवशी कर्मचा-यांना रात्री उशिरापर्यंत थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. घरच्या घरी करा पर्यावरणपूरक विसर्जन
शहरात जवळपास पाच लाख गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. त्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यातून पाणी दूषित होते. ते रोखण्यासाठी पालिका, कमिंस इंडिया आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्या वतीने पर्यावरण पद्धती विकसित केली आहे. अमोनियम बायकार्बोनेटची पावडर मिसळून त्यात विसर्जन केल्यास 72 तासांत ते विरघळते. घरच्या घरी विसर्जनासाठी ही पावडर मोफत देण्यात येत आहे. ती पावडर क्षेत्रीय कार्यालयातून मोफत वाटप केली जाणार आहे.
अग्निशामक दलाकडून गणेश मुर्ती विसर्जनाकरिता जीवरक्षक व साहित्य, उपकरणे यांची ‘या’ घाटावर व्यवस्था करण्यात आली आहे.
1)गणेश तलाव, प्राधिकरण तळे, 2) वाल्हेकरवाडी, जाधवघाट 3)रावेत घाट, जलशुध्दीकरण
केंद्र, 4) किवळेगांव घाट, स्मशानघाट 5) रावेत, भोंडवेवस्ती घाट 6) थेरगांव पुल नदीघाट, 7) मोरया
गोसावी, चिंचवड नदीघाट, 8) केशवनगर, चिंचवडघाट 9) ताथवडे, स्मशानभूमीजवळील घाट
10)पुनावळे गांव, राममंदीर घाट 11) वाकड गावठाण घाट 12) कस्पटेवस्ती घाट 13)सांगवी
स्मशानभूमी जवळील घाट 14) सांगवी आहिल्याबाई होळकर घाट, 15) सांगवी वेताळबाबा मंदीर घाट
16) कासारवाडी स्मशानभूमी जवळील घाट 17) फुगेवाडी, स्मशानभूमीजवळील घाट 18) बोपखेल घाट
19) पिंपरीगांव, स्मशानभूमीजवळील घाट, 20) काळेवाडी स्मशानभूमीजवळील घाट 21) पिंपळेगुरव
घाट 22) काटेपिंपळे घाट क्र.1 23) सुभाषनगर घाट, पिंपरी 24) पिंपळेनिलख घाट 25) मोशी नदी
घाट 26) चिखली स्मशानभूमी जवळील घाट
अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘पालिकेच्या सर्व आठ प्रभाग स्तरावर कामे करण्यात आली आहेत. घाटांची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात 48 विसर्जन घाट असून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी घाट तयार करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, अग्निशामक जवान, वैद्यकीय कर्मचारी, जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत. तसेच निर्माल्य कुड्यांची देखील व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी कुड्यांमध्येच निर्माल्य टाकावे’.