‘शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे’; एकनाथ शिंदे
![Eknath Shinde said that the agriculture department should be vigilant to get quality seeds and fertilizers to the farmers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/eknath-shinde-2-1-780x470.jpg)
मुंबई : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधता आला. त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी खरीप हंगामाची उत्तम पूर्व तयारी झाली आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. लिंकेजच्या तक्रारी आल्या, तर तातडीने कारवाई करावी. शेतकऱ्यांसाठी पुरेसे बी-बियाणे, खतांचा साठा उपलब्ध असून ते वेळेत मिळतील, अशी दक्षता कृषी विभागाने घ्यावी. यंदाच्या मॉन्सूनवर एल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरण्यांचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. राज्य शासनाच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे बियाणे दर्जेदार असावे. त्याचीही आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसाय, कृषी पर्यटनावर भर द्यावा. जलयुक्त शिवार योजनेची भूजल पातळी उंचावण्यास मदतच झाली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा – ‘भाकरी एकाची, चाकरी दुसऱ्याची..हा राऊतांचा सध्याचा फॉर्म्युला’; भाजपची खोचक टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यंदाच्या पावसाळ्यावर एल- निनोचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अन्य दोन घटक पावसाला अनुकूल आहेत. त्यानंतरही पावसाने ओढ दिली, तर कृषी विद्यापीठांनी पेरण्यांचे वेळापत्रक निश्चित करावे. त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाने जनजागृती करावी. बोगस बियाणे, खते विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत. शेतकऱ्यांची कृषी कर्जासाठी अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करावा. पीक कर्ज वितरणाला गती द्यावी. जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज वितरणाचा नियमितपणे आढावा घ्यावा. पावसाळा सुरू होईपर्यंत तलावातील गाळ काढणे, बांधबंदिस्ती, जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी. हवामान केंद्र अद्ययावत करावीत. आगामी काळात पिकांचे पंचनामे करताना मानवी हस्तक्षेप टाळून तो ई- पीक पाहणीच्या माध्यमातूनच झाला पाहिजे. तसेच ऊर्जा विभागाने जोडण्यांची संख्या वाढवावी. याशिवाय मुख्यमंत्री सौर ऊर्जा विभागाला सर्व विभागांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कृषी क्षेत्राच्या सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने राज्यात सर्वत्र खरीप हंगामपूर्व आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. राज्यात सन २०२२-२३ मध्ये धान्य पिकाचे १७२.४९ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र ५८.२८ लाख हेक्टर राहणार आहे. यामध्ये कापूस पिकाखाली ४१.६८ लाख हेक्टर, तर सोयाबीन पिकाखाली ४९.११ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.९१ लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.१० लाख हेक्टर, तर कडधान्य पिकाखाली २०.५३ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. या खरीप हंगामासाठी १९.२३ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, खासगी उत्पादकांमार्फत २१.७७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. ते आवश्यकतेपेक्षा ११३ टक्के आहे. याशिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.