नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्च रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार
![Namo Trophy, Competition Prize, Distribution Ceremony, March 27, Guardian Minister, Chandrakantada Patil,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Karandak-780x470.png)
पुणे : संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती करण्याचे काम केले होते. हाच वसा पुढे नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. हा नारा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी भाजप नेते गिरीश खत्री हे प्रयत्न करत आहेत. गिरीश खत्री हे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या वतीने ‘ नमो करंडक स्पर्धा – २०२२’ (NaMo karadankad spardha2022)या स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा आता बक्षीस वितरण समारंभ होणार असून याबाबत माहिती देण्याकरिता आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश दिला. आज आपण पाहतोय की या स्वच्छ भारत अभियानाने चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. एका जनआंदोलनाच्या स्वरुपात हे सर्व सुरु आहे. स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे आणि तोच उपक्रम किंवा त्याच माध्यमातून हे काम आम्ही पुढे नेत आहोत. ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच स्वच्छतेचा जागर व्हावा हीच यामागील संकल्पना आहे.
या स्पर्धेत गेल्या वर्षी ४२ सोसायट्यांनी सहभाग नोंदवला होता तर या वर्षी तब्बल ९० सोसायट्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. आता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार, दिनांक २७ मार्च २०२३ रोजी डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्स येथे सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. हा सोहळा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहळ, पुणे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, गायक शौनक अभिषेकी, गायक डॉ.सलील कुलकर्णी (ब्रँड अॅम्बेसेडर : स्वच्छ भारत अभियान पुणे ) यांच्यासह अनेक मान्यवर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती खत्री यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या सोहळ्यात केवळ बक्षीस वितरणच नव्हे तर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. याशिवाय स्वच्छतेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या दिव्यांग बांधवांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे.