३ लाखांची लाच घेताना युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवासह दोघांना पकडले
![3 lakh bribe, Youth Congress, state general secretary, two caught,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Congress-Arested-780x470.jpg)
पुणे : सासवड परिसरातील एका महाविद्यालयाच्या संचालकाला धमकावून तीन लाखांची लाच घेताना युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवासह दोघांना लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून पकडले.
अक्षय सुभाष मारणे (वय २९), गणेश बबनराव जगताप (वय ४०, दोघे रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे अहोत. याबाबत महाविद्यालयाच्या संचालकांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप हे युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आहेत.
तक्रारदारांचे सासवड परिसरात महाविद्यालय आहे. आरोपी मारणे आणि जगताप यांनी महाविद्यालयाच्या संचालकांना धमकावले होते. ‘तुमच्या विरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे’ अशी धमकी देऊन त्यांनी महाविद्यालयाच्या संचालकाकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. मारणे आणि जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने धमकावून त्यांच्याकडे तीन लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या संचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून दोघांना पकडले.
दरम्यान, आरोपींनी सासवड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाचा वापर करुन महाविद्यालयाच्या संचालकांना धमकावल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करत आहेत.