संजय राऊतांचा आयएनएस विक्रांत प्रकरणावरून किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप; म्हणाले..
![Sanjay Raut's serious allegations against Kirit Somaiya over the INS Vikrant case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/kirit-somaiya-and-sanjay-raut-780x470.jpg)
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आयएनएस विक्रांत प्रकरण चर्चेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतवरून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी वेगवेगळे आरोप करण्यापेक्षा आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला?, हे सांगावे, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी लाखो करोडो रूपये जमा केलेले आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू होती. मात्र, सरकार बदलले आणि चौकशी रोखण्यात आली. मी स्वत: विक्रांतचे पैसे कुठे ठेवले आहेत? हे विचारणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
आयएनएस विक्रांत प्रकरणी न्यायालयात जाणार आहोत. किरीट सोमय्यांनी वेगवेगळे आरोप करण्यापेक्षा आयएनएस वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला? हे सांगावे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून सभांचे सत्र सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, शिंदे आणि भाजपा सरकारने तपास यंत्रणांचा वापर करत किरीट सोमय्यांसारख्या 28 चोरांना क्लिनचिट दिलेली आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. आयएनएस विक्रांत निधी प्रकरणाच्या गैरव्यवहारावरून न्यायालयात दाद मागणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या आरोपांना किरीट सोमय्या काय उत्तर देणार?, हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.