“..अथवा नसो आम्ही सरकारबरोबर”; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य
![Bachu Kadu's big statement regarding cabinet expansion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/bacchu-kadu-1-780x470.jpg)
कशामुळे विस्तार थांबला, काय अडचण आहे, हे स्पष्ट झालं पाहिजे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील युतीचे सरकार अस्तिवात येऊन आज सात महिने झाले आहेत. मात्र अद्याप संपुर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक वक्तव्य केलं आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराचं अजूनही खरं दिसत नाही. विस्तार होईल तेव्हा होईल, त्याचा प्रश्न नाही. पण, विस्ताराबाबत सर्व आमदारांची बैठक घेण्यात यावी. आमचं मंत्रिमंडळात नाव असो अथवा नसो आम्ही सरकारबरोबर असणार. कशामुळे विस्तार थांबला असून, काय अडचण आहे, हे कुठेतरी स्पष्ट झालं पाहिजे, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
पहिल्या सरकारमधून बाहेर पडत, दुसऱ्या सरकारमध्ये आलेल्या आमदारांत मोठा संभ्रम निर्माण हेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता केली पाहिजे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुळात याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून जनतेची गैरसोय होत आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते.