मंत्रिमंडळ विस्तारावर आमदार बच्चू कडूंचे सूचक विधान; म्हणाले, राज्यात सध्या राजकीय अस्थिरता..
येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रीपद मिळेल
नागपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील युतीचे सरकार अस्तिवात येऊन आज सात महिने झाले आहेत. मात्र अद्याप संपुर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे.
धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळविस्तार रखडला आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, असं आमदार बच्चू कडू म्हणाले. विशेष म्हणजे काल परभणीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, प्रहार संघटनेने दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली असून येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रीपद मिळेल, असंही बच्चू कडू म्हणाले.
राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुळात याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यात लवकर राजकीय स्थिरता यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.