अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा? ः गद्दारी करणाऱ्यांना मतदार जागा दाखविणार…
![Ajitdad's target on Chief Minister Eknath Shinde? Voters will show seats to traitors...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Ajit-Pawar-780x470.jpg)
परभणी : गेल्यावेळी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार या नात्यानं लोकांनी निवडून दिलं होतं. शिंदे यांनी बंड केला. असं करता येत नाही. पण, चेंडू आता सर्वोच्च न्यायालयात आहे. दुसरा निवडणूक आयोगाच्या समोर आहे. हा निकाल देशाच्या सर्व निकालावर परिणाम टाकणारा राहणार आहे. यात काही घडलं तर देशात कायमची अस्थिरता राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. अजित पवार परभणी येथे बोलताना म्हणाले, पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा खूप गाजली. लोकं आम्हाला याबद्दल विचारायला लागले. अशी पद्धती लोकांना आवडत नाही. त्यामुळं लोकं वाट पाहत आहेत की, कधी निवडणुका लागतात.
अशांना मतदार जागा दाखवेल
ज्यांनी गद्दारी केली, वेगळी भूमिका घेतली. त्यांची जागा दाखविण्यासाठी मतदार सज्ज आहेत. आता काही ठिकाणी निवडणुकीवर परिणाम व्हायला लागला, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
म्हणून महत्त्वाचे काही निर्णय घेता आले नाही
आम्ही महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असताना कोरोनाचं सावट होतं. प्रत्येक माणसाचा जीव वाचविणं ही प्राथमिकता होती. ही बाब लक्ष्यात घ्या. त्यामुळं काही महत्त्वाचे निर्णय घेता आले नाही, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली. पण, आमचं सरकार राहिलं असतं तर त्यांना प्राथमिकता दिली असती, असंही त्यांनी म्हंटलं.
अनेक स्थितंतरे पाहिलीत
अजित पवार यांनी सांगितलं की, मी गेल्या ३२ वर्षांच्या काळात अनेक स्थितंतर पाहिली. अनेक मुख्यमंत्री पाहिलेत. विक्रम काळे यांना गेली काही वर्षे ओळखतोय. वसंतराव काळे यांच्यानंतर अकस्मितरीत्या विक्रम काळे यांच्यावर जबाबदारी आली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वी पक्ष सोडून जाणाऱ्यांना निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळं निवडणुका झाल्यास लोकं योग्य ते उमेदवार निवडून देतील, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.