महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा साकारणार ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’

कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानीचे तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश
मुंबई : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पांनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आल्याचे सांगितले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येते होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्तीचा जागर’ यावर साकारणार आहे. याबाबत माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यानिमित्ताने सर्व देशवासीयांना घरबसल्या होणार आहे.





