यष्टीरक्षक वृद्धीमान साहा ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Saha.jpg)
भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा वर्षाअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. Cricbuzz वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, वृद्धीमान साहाला दुखापतीमधून सावरण्यासाठी किमान ४ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. आयपीएलमध्ये खेळत असताना झालेल्या दुखापतीनंतर साहा क्रिकेटपासून दुरावला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार संपूर्णपणे बरं झाल्यानंतर मी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचं साहाने स्पष्ट केलं आहे.
“सध्या मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करतो आहे. किती लवकर मी परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो हे मला तपासायचं आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता पुढचे ३-४ महिने मी क्रिकेट खेळू शकणार नाही.” वृद्धीमान साहाने आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली. त्यामुळे भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही साहा सहभागी होण्याची शक्यता कमीच आहे.
साहाच्या अनुपस्थितीत सध्या दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांनी भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र दोन्ही खेळाडूंना हवीतशी कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभ आणि दिनेश कार्तिक यांनी यष्टीमागे अनेक धावा बहाल केल्या आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला साहाची उणीव भासत आहे. त्यामुळे सध्याच्या इंग्लंड दौऱ्यातली कामगिरी पाहता भारतीय संघ साहाची दुखापत लवकर बरी होवो अशी प्रार्थना करत असेल.