संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यालयाबाबत इशारा, म्हणाले शिंदे गट घुसखोरच…
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून काल, बुधवारी शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले होते. त्यामुळे पालिकेत तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सर्वक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याचा संदर्भ देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यालयाबाबत इशारा दिला आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपली असली तरी, निवडणूक होईपर्यंत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांना व गटनेते आदींना पक्ष कार्यालय वापरता यावे, यासाठी खुले ठेवले होते. बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, उपनेते यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदींनी पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात जाऊन ठाण मांडले. त्यावेळी पक्ष कार्यालयात फक्त कर्मचारी वगळता उद्धव ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. मात्र या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सदानंद परब आदींनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर तिथे वादाला तोंड फुटले. त्यानंतर आयुक्त चहल यांनी सर्व पक्षांची कार्यालये सील केली.
खासदार संजय राऊत यांनी यावरून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गट घुसखोरच आहे. त्यांचे काहीही अस्तित्व नसल्याने असे प्रकार घडत आहेत. सत्तेमुळे झुंडशाही, मस्तवालपणा आला आहे. पण खरा शिवसैनिक कसा असतो हे काल, बुधवारी सर्वांनी पाहिले, असे संजय राऊत म्हणाले.
पालिका प्रशासनाने सर्व पक्ष कार्यालये सील केल्याबद्दल संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. पालिका आयुक्तांनी पक्ष कार्यालयांना सील लावल्याचे समजले. ही कारवाई कोणत्या कायाद्याने केली? असा सवाल करून ते म्हणाले, ही मनमानी आहे, लोकशाहीचा खून पाडला जात आहे. हे कोणाच्या आदेशाने सुरू आहे? ठोकशाहीने राज्य केले जात असले तर, आमच्याशी कोणी स्पर्धा करू नये. पक्ष कार्यालय शिवसेनेच्या ताब्यात राहील.
आता यापुढे पालिका आयुक्त आणि मुख्यंत्री एकनाथ शिंदे सावधपणे पावले टाकतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, एखादे दिवशी तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात भाजपावाले घुसतील तुम्हाला कळणारही नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.