पालिकांचे निर्णय मंत्रालयातून होणे चांगल्या सरकारचे लक्षण नाही : पवार
यापूर्वी महापालिकांचे निर्णय आयुक्त व कामगार प्रतिनिधी यांच्यात चर्चा होऊन होत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. नगरपालिका व महापालिकांचे छोटे-मोठे निर्णय देखील आता मंत्रालयातून घेतले जातात, हे चांगल्या सरकारचे लक्षण नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या तळेगाव येथील पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. नवनाथ घाडगे, अॅड. महाबळ शेट्टी, विदुरा नवले, संजय भेगडे, कृष्णराव भेगडे, मदन बाफना, चित्रा जगनाडे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
शरद राव यांच्या विविध स्मृतींना उजाळा देत पवार म्हणाले, की कामगारांचे हित पाहणारा नेता म्हणून राव यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. नागरिकांना त्रास न होता आंदोलन, संप करून व्यवस्थापन तसेच सरकारला भूमिका बदलण्यास ते भाग पाडत होते. संघर्ष कधी करायचा आणि कधी थांबवायचा हे राव यांनी देशभरातील कामगार संघटनांना शिकवले. पवार यांच्या हस्ते या वेळी बबन िझजुर्डे, नाना ओरपे, चित्रा जगनाडे यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, नूर अहमद, शंकर शेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्योती आंबेकर यांनी केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.