मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन
![11 policemen suspended in case of slapping Minister Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/6b9f485631950ce783b95fa4b0e0bf181670729896157339_original-720x470.webp)
यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, आता या घटनेनंतर 11 पोलिसांचं निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतही पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
काल शाईफेक झाल्यानंतर मंत्री चद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी पाटील यांनी या घटनेचा निषेध केला होता. महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिलं होतं. तसेच, ही लोकशाही नाही. या घटनेप्रकरणी पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही. पोलिसांवर निलंबनाची कारवाई करु नका, यामध्ये त्यांची काहीही चूक नाही, अशी विनंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही अखेर 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.
एका पत्रकारालाही अटक
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात पडले आहेत. या घटनेनंतर आठ पोलिस कर्मचारी आणि तीन अधिकारी निलंबित करण्यात आल आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या थांबत नाही. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात घमासान सुरू आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. दरम्यान, सत्ता गेली त्यामुळं सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान सुरु असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काल पिंपरीत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.