पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे यंदा पुन्हा भरणार पवनाथडी जत्रा
![Pavanathadi Jatra will be held again this year by Pimpri Chinchwad Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/download.jpg)
कोरोनामुळे पावणेतीन वर्षाचा पडला खंड
सांगवी पीडब्ल्यू मैदानावर 16 ते 20 डिसेंबरदरम्यान आयोजन
पिंपरी : शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. मात्र, कोरोना महामारीमुळे पावणेतीन वर्षे या जत्रेमध्ये खंड पडला होता. आता यावर्षी पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिका पवनाथडी जत्रा भरविणार असून सांगवीतील पीडब्ल्यू मैदानावर येत्या 16 ते 20 डिसेंबर दरम्यान पाच दिवस ही जत्रा असणार आहे.
सांगवीत 9 मार्च 2020 ला पवनाथडी जत्रा झाली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काही दिवसांनी कोरोना महामारीचा उद्रेक सुरू झाला. परिणामी, पावणेतीन वर्षे जत्रेचे आयोजन करण्यात आले नाही. कोरोना महामारी जाऊन सर्व निर्बंध शिथिल झाल्याने जत्रेचे आयोजन केले जाणार नाही. जत्रेत महिला बचत गटांसाठी एकूण 400 ते 450 स्टॉल असतात. एका स्टॉलमध्ये दोन बचत गटांना जागा दिली जाते. असे एकूण 800 ते 900 स्टॉल असणार आहेत. जत्रेतील स्टॉलसाठी शहरातील महिला बचत गटांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.
जत्रेसाठी वीजपुरवठा व प्रकाश व्यवस्था करण्यासाठी जनरेटर पुरविण्यासाठी 35 लाख 60 हजार खर्चाची निविदा पालिकेच्या विद्युत मुख्यालय विभागाने प्रसिद्ध केली आहे. तसेच, मंडप, सुशोभीकरण, खेळणी व इतर कामांची निविदाही काढल्या जाणार आहेत.