राज्यात तीन महिन्यांत ‘लम्पी’चे वीस हजार बळी
![Twenty thousand victims of 'lumpi' in the state in three months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/lumpi-780x470.jpg)
पुणे : राज्याचा पशुसंवर्धन विभाग लम्पी त्वचा रोग नियंत्रणात आल्याचा दावा करीत आहे,मात्र लम्पीबाधित जनावरांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारअखेर (२५ नोव्हेंबर) राज्यात लम्पीमुळे सुमारे वीस हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील लम्पी त्वचा रोगाची साथ नियंत्रणात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात रोज पाचशे जनावरांचा मृत्यू लम्पीमुळे होत असल्याचे पशुसंवर्धन विभागच जाहीर करीत आहे.
२४ ऑगस्ट रोजी राज्यात पहिला लम्पी बाधित पशू आढळून आला होता. त्याला तीन महिने पूर्ण झाले आहेत. या तीन महिन्यांत लम्पीची साथ ३४ जिल्ह्यांत पसरली आहे. लम्पीचा उद्रेक झालेली ठिकाणे एकूण ३७४१ आहेत. या भागात २ लाख ९८ हजार २८५ जनावरांना लम्पी रोगाची बाधा झाली होती. त्यापैकी २ लाख १९ हजार ६५७ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत, तर २०३६१ जनावरे लम्पीमुळे मृत्यूमुखी पडली आहेत. हे संपूर्ण मृत्यू गोवंशाचे असून, त्यात देशी गोवंशाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
शेतकऱ्यांना वीस कोटींची मदत
लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली होती. दुभत्या गाईंसाठी ३० हजार, बैलासाठी २५ हजार आणि वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा पशुसंवर्धन विभागाने केली होती. त्यानुसार आजवर राज्यातील ७९०९ पशुपालकांच्या खात्यांवर २०.१२ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
साथीवर पूर्ण नियंत्रण अशक्य
लम्पी त्वचा रोगाची साथ पूर्णपणे नष्ट होणे किंवा साथीवर शंभर टक्के नियंत्रण मिळविता येणार नाही. किरकोळ प्रमाणात साथ सुरूच राहील. मानवामध्ये जसे स्वाइन फ्ल्यू, करोनाची साथ नियंत्रणात आहे, पण विषाणू नष्ट झालेला नाही, त्या प्रकारे पशूंमध्ये हा विषाणू बराच काळ राहील. पशूंची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे, हाच एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. त्यासाठी लसीकरण केले जात आहे. खास लम्पी त्वचा रोगासाठी विकसित केलेली लस लवकरात लवकर बाजारात आणणे, हाच एकमेव पर्याय आहे, अशी माहितीही नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिली.