लग्नाला नकार दिल्याने स्वतः जाळून घेत प्रेयसीला मिठी मारणाऱ्या प्रियकराचा अखेर मृत्यू
![A lover who embraced his girlfriend by burning himself after refusing marriage finally died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Fire.jpg)
संभाजीनगर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने स्वतः जाळून घेत प्रेयसीला मिठी मारणाऱ्या प्रियकराचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हे दोघेही पीएचडीचं शिक्षण घेत होते. गजानन मुंडे असे मृत झालेल्या तरुणाचं नाव असून प्रेयसी पूजावर उपचार सुरू आहेत.
गजानन मुंडे आणि त्याची प्रेयसी पूजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेत जीवभौतिकशास्त्र या विषयात पीएचडी करत होते. या विद्यापीठातच दोघांची ओळख झाली. आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. गजानन हुशार विद्यार्थी असल्याने त्याच्या प्राध्यापकांनी त्याची समजूतही काढली होती. परंतु, गजाननने पूजाच्या मागे लग्नाचा तगादा लावला. त्याच्या त्रासाला वैतागून पूजाने त्याची पोलिसांत तक्रार केली. तरीही गजानन तिच्या मागे असायचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात हे दोघेही आले होते. यावेळी या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला. यातून गजानने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. जळल्यानंतर त्याने पूजाला मिठी मारली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. या आगीत गजानन ९५ टक्के भाजला होता. त्यामुळे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर, पूजावर अद्यापही उपचार सुरू आहेत.
“पूजाने माझ्याशी लग्न केलं होतं. नंतर तिने विश्वासघात केला. मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहे. पण तरीसुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला सारखं टाळते. पोलिसांकडे तिने तक्रार सुद्धा दिली होती. मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. पण तिने ते ओळखलं नाही. त्यामुळे आपणही जगायचं नाही, तिलाही जिवंत ठेवणार नाही, असा निर्णय घेऊन स्वत:ला पेटवून घेतलं,” असा जबाब गजानन मुंडे याने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला होता.
तर, “गजानन हा नेहमीच त्रास देत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिली होती. माझा तो पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याची समजूत काढली. पण त्याने माझे काही ऐकले नाही,” असा जबाब जखमी पूजाने दिला आहे.