breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणलेख

लोकसंवाद: शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा ‘सातारा पॅटर्न’

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे २०२४ चे उमेदवार

खासदार डॉ. कोल्हे यांच्या ‘भाजपा कनेक्शन’मुळे सावध भूमिका
पुणे । विशेष प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे गेल्या काही दिवसांपासून ‘भाजपा कनेक्शन’ची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतील संभाव्य दगा-फटका झाल्यास ‘सातारा पॅटर्न’ ची तयारी केली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत उदयनराजे निवडून आले. मात्र, उदयनराजे यांनी अल्पावधीतच खासदारपदाचा राजीनामा देवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला नामुष्कीचा सामना करावा लागला. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही निवडणूक हातात घेतली आणि आपले विश्वासू मित्र श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले. ही निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी अत्यंत प्रतिष्ठेची झाली. उदयनराजे यांना पराभूत करणे… ही सोपी बाब नव्हती. मात्र, पवारांशी पंगा घेणे उदयनराजे यांना महागात पडले. उदयनराजे यांचा पराभव झाला.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला आव्हान देण्याची ऊर्जा देणारी सातारा लोकसभा पोटनिवडणूक शरद पवार आणि राष्ट्रवादीने एकहाती जिंकली. याच निवडणुकीचे पडसाद राज्यातील विधानसभा निवडणुकीतही उमटले, ही वस्तुस्थिती आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात साताराच्या छत्रपती घरण्याप्रती आदराचे स्थान आहे. मात्र, तरीही उदयनराजे यांना मतदारांना गृहित धरणे भोवले होते. आजच्या घडीला शिरुर लोकसभा मतदार संघात तशीच काहीशी स्थिती आहे. ‘‘स्वराज्यरक्षक संभाजी’’ मालिकेमुळे प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने २०१९ मध्ये तिकीट दिले. बलाढ्य शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात डॉ. कोल्हे निवडून आले. साताऱ्यात उदयनराजेंनी आणि शिरुरमध्ये आढळराव पाटलांनी पवारांना आव्हान दिले होते. त्याचा वचपा पवार आणि राष्ट्रवादीने काढला.
याच धर्तीवर शिरुरमध्ये दगाफटका झाल्यास डॉ. कोल्हे यांचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २०२४ मधील आगामी लोकसभा निवडणुकीत ‘सातारा पॅटर्न’ राबविणार, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
शिरुरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता…
दरम्यान, डॉ. कोल्हे भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. कोल्हे अनुपस्थित दिसतात. विशेष म्हणजे, भाजपा प्रवेशाबाबत सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून चर्चा घडत असताना डॉ. कोल्हे किंवा राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही. याउलट, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या ‘स्टार प्रचारक’ यादीतून डॉ. कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे शिरुरमध्ये राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे सातारा पॅटर्न?
सातारा लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यांसमोर दिसत असतानाही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही निवडणूक हातात घेतली. आपले निष्ठावंत आणि विश्वासू मित्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. मतदार संघ पिंजून काढला आणि विजयश्री खेचून आणली. त्याच धर्तीवर भोसरी विधानसभा संघातील शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावंत माजी आमदार विलास लांडे यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी करु शकतात. कारण, लांडे यांनी २००९ साली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. तसेच, भोसरीसह खेड विधानसभा मतदार संघात लांडे यांचा मोठा प्रभाव आहे. दुसरीकडे, आंबेगावमध्ये दिलीप वळसे-पाटील आणि जुन्नरमधून अतूल बेनके यांच्याशी लांडे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. हडपसर आणि हवेली दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. शिरुरच्या ग्रामीण भागात लांडे यांचा जनसंपर्कही मोठा आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी भाजपात प्रवेश करुन दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास शरद पवार माजी आमदार विलास लांडे यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लांडेच्या नेतृत्त्वात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची फिनिक्स भरारी?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. वास्तविक, राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये लांडे यांना शहराध्यक्षपदाची संधी मिळणे अपेक्षीत होते. त्यासाठी लांडे इच्छुकही होते. मात्र, अजित पवार यांनी त्यांचे भाचे अजित गव्हाणे यांच्याकडे जबाबदारी सोपवली. त्यामुळे पक्षांगर्तत दोन गट निर्माण झाले आहेत. दुसरीकडे, शरद पवार यांच्या ‘थेट कनेक्ट’मध्ये असलेले लांडे काहीसे नाराज असल्याबाबतही चर्चा झाली. परंतु, महापालिका निवडणुकीत लांडे यांची ही नाराजी राष्ट्रवादीला परवडणारी नाही. विलास लांडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित करण्यात येईल. त्याआधारे त्यांना सक्रीय करुन महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी रणनिती आखण्यात येईल. विलास लांडे यांच्याकडे शहर राष्ट्रवादीची सूत्रे एकवटल्यास भाजपासमोर तगडे आव्हान उभा करता येईल, असा दावा काही लांडे समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेईल्, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button