पुन्हा ‘चक्काजाम’चा ‘स्वाभिमानी’चा इशारा
![Chakkajam's 'swabhimani' warning again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/swabhimani-farmers-movement-780x470.jpg)
पुणे : एकरकमी एफआरपीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला, त्याची कोणतीही दखल सरकारने घेतली नाही. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरूच आहे. त्यामुळे दोन दिवसांचे चक्काजाम आंदोलन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या नंतरही सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास २५ नोव्हेंबरला पुन्हा चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘दोन दिवसांचे आंदोलन आज (शुक्रवारी) थांबवत आहोत. शेतकरी, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांनी आम्हाला सहकार्य केले. कुठेही जबरदस्तीने ऊसतोडी किंवा ऊस वाहतूक बंद करावी लागली नाही. शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय. पण, सरकार आमची दखल घेत नाही. सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा २५ नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन करणार आहोत. एफआरपी काढण्याचे सूत्र निश्चित केले तेव्हा इथेनॉल निर्मिती होत नव्हती. त्यामुळे आता नव्याने उसासाठी एफआरपी निश्चित करणारे सूत्र पुन्हा ठरवावे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. नव्याने मिळणारी एफआरपी एकरकमी मिळावी, तिचे तुकडे पाडू नका. कारखान्यांवर काटामारी सुरूच आहे. त्यातून शेतकऱ्यांची दरवर्षी ४५०० हजार कोटींची लूट कारखाने करतात. वाहतूक खर्चात सतत वाढ दाखविली जाते. हे सर्व थांबविण्याची आमची मागणी आहे. या बाबत आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत,पण सरकार ढिम्म आहे. काहीच निर्णय घेत नाही. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, आम्हाला हिंसक आंदोलन करण्यास सरकारने भाग पाडू नये.’