गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे पाप झाकण्याचा प्रयत्न, भाजपाचा पलटवार
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या टाटा एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेबाबत केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, असा पलटवार प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने आवश्यक अशा एअरबसचे तंत्रज्ञान असलेल्या सी-295 मालवाहू विमानांची बांधणी बडोद्यात केली जाणार आहे. टाटाचा हा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली आहे. या टीकेचा उपाध्ये यांनी आज समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यावर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअरबस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.