सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श : भाजपाचे एकनाथ पवार ‘या’ कारणास्तव वाढदिवस साजरा करणार नाही !
![Ideal of civilized politics: BJP's Eknath Pawar will not celebrate his birthday for 'this' reason!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Landge-Pawar-780x470.jpg)
यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय! एकनाथदादाचं कार्यकर्त्यांना आवाहन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड राजकीय परिघाला सुसंस्कृत आणि आपुलकीचा- जिव्हाळ्याचा नात्या-गोत्याचा सुगंध आहे. भले राजकीय उलथापालथ काहीही होवो. संपूर्ण राज्यात राजकारणाची पातळी आणि दर्जाही घसलेले असताना पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापतरी सुसंस्कृतपणा आणि राजकारणापलिकडील माणुसकी कायम आहे. त्याचा प्रत्यय माजी सत्तारुढ पक्षनेते आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांच्या कृतीतून पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. या दु:खात सहभागी होत माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी यावर्षी (२५ ऑक्टोंबर) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून नुकसानग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असेही आवाहन एकनाथदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन एकनाथ पवार यांनी केले आहे.
एकनाथ पवार यांचा समंजसपणा…
२०१४ मध्ये प्रचंड मोदी लाट असताना भोसरी विधानसभा मतदार संघातून एकनाथ पवार यांनी अधिकृत ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी महेश लांडगे यांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढवली होती. त्यानंतरच्या काळात लांडगे यांनी भाजपाशी सलोखा वाढला. भविष्यातील प्रतिस्पर्धी असतानाही भाजपाच्या निष्ठावंत गटाचा प्रभावी चेहरा असेलल्या एकनाथ पवार यांनी पक्षहितासाठी समंजसपणा दाखवला. २०१७ च्या निवडणुकीत त्यांना भाजपाच्या तिकीटावर महापालिका निवडणूक जिंकली. भाजपाच्या सत्ताकाळात पहिले सत्तारुढ पक्षनेते झाले. त्यानंतर २०१९ मध्ये आमदार लांडगे यांनी भाजपाच्या तिकीटावर विधानसभा लढवली. त्यावेळी एकनाथ पवार यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले. आपसातील स्पर्धा बाजुला ठेवून आपण विधानसेचे दावेदार नाही, असे स्पष्ट केले. पक्षादेश आणि पक्षहित यासाठी एकनाथ पवार यांनी समंजसपणा कायम दाखवला. प्रदेश प्रवक्ता पदावर संधी मिळाल्यानंतर आता एकनाथ पवार पक्षाची पर्यायाने विद्यमान अध्यक्ष असलेले महेश लांडगे यांची बाजु अत्यंत सक्षमपणे मांडताना दिसतात. ही बाब राजकीय समंजसपणा आणि खिलाडूवृत्तीचा आदर्श आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.